scorecardresearch

“साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे मंत्री संतापले; म्हणाले…

धीरेंद्र कृष्ण शास्त्री विधाने आणि चमत्कारामुळे चर्चेत असतात.

saibaba dhirendra krushna shastri
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

अलीकडच्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. अशातच आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता शिर्डीचे साईबाबा यांना देव मानण्यास नकार दिला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जबलपूर येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाविकांशी संवाद साधला. तेव्हा एका भाविकाने साईबाबांची पूजा केली पाहिजे की नाही? असा प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना विचारला. त्यावर “गिधाडाचे चामडे पांघरून कोणी सिंह होत नाही,” असं उत्तर धीरेंद्र शास्त्री यांनी दिलं.

हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर…”, ‘त्या’ प्रकरणावरून शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना आव्हान

“आपल्या शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्यांचं मत हे बंधनकारक आहे. शंकराचार्य हे सनातनी धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे प्रत्येक सनातनी धर्माने त्यांचं ऐकलं पाहिजे. कोणताही संत असतील, मग ते आपल्या धर्माचं का असेना, ते देव होऊ शकत नाहीत. कोणतेही संत असुद्या, त्यात गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत, काही युगपुरुष आहेत, तर काही कल्पपुरुष आहेत. पण, यात देव कोणीही नाही,” असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं.

“आम्ही कोणाच्याही भावनेचा अपमान करत नाही. साईबाबा संत असू शकतात. फकीर असू शकतात. मात्र, ते देव होऊ शकत नाही,” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

हेही वाचा : “कुणीतरी आपल्या पत्नीबरोबर वावरतंय याची माहिती फडणवीसांना…”, सुषमा अंधारेंचं गृहमंत्र्यांवर टीकास्र!

यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया देत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “बाबालोक स्वत: देवाचं रूप घेऊन लोकांची बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. हे धार्मिक तेढ निर्माण करत, सामाजिक अशांतता पसरवण्याचं काम करतात. कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आहे. एखाद्याच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणाला दिला नाही,” असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 14:40 IST

संबंधित बातम्या