नांदेड : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांचे नाव हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
मराठवाडय़ातील लातूर-नांदेड आणि हिंगोली हे तीन एकमेकांशी जोडलेले लोकसभा मतदारसंघ भाजप आणि शिवसेना-शिंदे गट यांच्या ताब्यात असून, आगामी निवडणुकीत या तीनही जागा कायम राखण्याकडे भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत हिंगोलीची जागा शिवसेनेने लढविली. तेथे या पक्षाकडून हेमंत पाटील खासदार झाले. गतवर्षी या पक्षातील फुटीनंतर खासदार पाटील शिंदे गटात सामील झाले. ही जागा शिवसेनेची असली, तरी मोपलवार यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित होत असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यास विरोध होण्याची शक्यता नाही. कारण शिंदे आणि मोपलवार यांचेही जवळचे संबंध असून, मोपलवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपच्या नांदेडमधील उमेदवाराला बळ मिळू शकते, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे.
हेही वाचा >>>“२००४ ला भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी…”, वाजपेयी-महाजनांचा दाखला देत प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
हिंगोली लोकसभा क्षेत्रातील हदगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या मोपलवार यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रयत्न भाजप-संघ परिवारातील काही हितचिंतकांकडून झाला होता, पण नंतर त्यांचे नाव चर्चेत आले नाही. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम त्यांच्या माध्यमातून गतिमान करण्याचे फडणवीस यांनी निश्चित केले होते. त्यामुळे त्यांनी मोपलवार यांना निवडणूक रिंगणात आणले नाही.हिंगोली मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी आधी दोन-तीन नावे चर्चेमध्ये होती. माजी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी गेल्या दीड वर्षांत संघटनात्मक बाबींत लक्षणीय काम केले.