राहाता : ग्रामस्थ आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले. गावात अनेक विकासकामे झाली. गावाच्या एकोप्यामुळे अडीच कोटींच्या ठेवी असलेली ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

१०८ वर्षांपासून लोणी बुद्रुक येथे दिवाळी पाडव्याला ग्रामसभेचे आयोजन केले जाते. ग्रामसभेला जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी खासदार तथा विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, सरपंच कल्पना मैड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संपत विखे, प्रवरा बँकेचे संचालक किसन विखे, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक धावणे, उपाध्यक्ष नाना म्हस्के, उपसरपंच गणेश विखे, एम. वाय. विखे, रंगनाथ विखे, वसंत विखे, अण्णा म्हस्के, विजय लगड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले की, काळानुरूप विकासाचे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. व्यावसायिकांनी गाळा भाडे व नागरिकांनी पाणी व घरपट्टी भरून पंचायतीला सहकार्य केले पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी आपण मिळवून देऊ. लोणी हे गाव शैक्षणिक केंद्र असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहावे. ओढे, नाल्यातून पाणी जाण्यात निर्माण झालेले अडथळे दूर केले जातील. त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, लोणी गावचा वेगाने विस्तार होत असल्याने सोयीसुविधा निर्माण करण्याचे आव्हान ग्रामपंचायतीपुढे असते. मंत्री विखे यांच्यामुळे निधी उपलब्ध होण्यात अडचण येत नाही. बाजारपेठ वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची नवीन योजना पूर्णत्वाकडे आहे. अनिल एकनाथ विखे यांनी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी कविता आहेर यांनी विकास कामांची माहिती दिली. अनिल नानासाहेब विखे यांनी आभार मानले.

भाडेकरूंची पोलीस पडताळणी

गावातील भाडेकरूंची माहिती घरमालकाने ग्रामपंचायतीकडे देणे आवश्यक आहे. भाडेकरूंची आता पोलीस पडताळणी होणार आहे. गावात गुन्हेगारी येऊ नये व इथल्या महिला, मुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील ज्या कुटुंबात आजपर्यंत व्यापारी संकुलात एकही गाळा मिळालेला त्यांना प्राधान्याने नूतन संकुलात गाळा देण्यात येणार आहे. लोणी गावात गुन्हेगारीला शिरकाव करू देणार नाही. – डॉ. सुजय विखे.