काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ असा उल्लेख करत जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना मार्ग दाखवला, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. तसेच मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं, असंही त्यांनी नमूद केलं. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, “शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला मार्ग दाखवला. ही त्या शिवाजी महाराजांची भूमी आहे. आई मुलाला मार्ग दाखवते. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कोणी बनवलं? ते शिवाजी महाराज कसे झाले? हे शिवाजी महाराज नेमके काय होते? हो, ते एक व्यक्ती होते. मात्र, ते केवळ एक व्यक्ती नव्हते. त्यांच्यात आणि आपल्यात एक फरक आहे. तो फरक म्हणजे ते महाराष्ट्राचा आवाज होते.”

“शिवाजी महाराजांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं”

“जनतेच्या मनातील सर्व भावना शिवाजी महाराजांच्या मनात होत्या. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं. आज आम्ही त्यांचंही स्मरण करतो. जे शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांनी म्हटलं तेच काम ही भारत जोडो यात्रा करत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या यात्रेला पुरेपुर प्रेम दिलं. ३,५०० किमी चालणं सोपं काम नाही. मात्र, जनतेने हे काम सोपं केलं,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “राहुल गांधींच्या वक्तव्याने मविआत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, “सावरकरांबद्दल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही”

“जनतेने प्रेम केलं, मदत केली, आम्हाला खूप शिकवलं. त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी माझं संपूर्ण आयुष्य हे विसरणार नाही की, महाराष्ट्राच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं, इतकी शक्ती दिली आणि इतकं ज्ञान दिलं,” असंही राहुल गांधींनी नमूद केलं.