सोलापूर शहरात तुळजापूर रस्त्यावर महापालिकेच्या कचरा डेपोलगत मेलेल्या जनावरांचे मांस, हाडांपासून तुपासारख्या बनावट तेलजन्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून संपूर्ण साहित्य जप्त केले. कारखान्याशी संबंधित दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या कारखान्यात हाडांची भुकटी आणि बनावट तेलजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी वीज चोरून वापरली जात होती. प्रदूषण नियंत्रण अधिनियम कायद्याचाही उघडपणे भंग होत असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी ट्रिपल ट्रेडिंग कंपनीचा मालक अब्दुल मजीद कुरेशी आणि वसी एन्टरप्रायझेसचा मालक अलीम अब्दुल मजीद कुरेशी यांच्याविरूध्द भारतीय वीज अधिनियम व प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध अधिनियमासह अन्य कलमांखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या अधिपत्याखालील विशेष भरारी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.