कराड : राज्य शासनाने पर्यावरणास घातक असलेल्या १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग पिशव्यांवर बंदी घातली असताना अशा कडक निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्या बनवण्याचा कारखानाच तासवडे औद्योगिक वसाहतीत उजेडात आला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या कारवाईत तब्बल चार टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून, त्याची किंमत कित्येक लाखात आहे. याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळने छापा टाकल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली असून, बंदी असणाऱ्या कॅरीबॅगची ठोक अथवा किरकोळ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तासवडे औद्योगिक वसाहतीत एका ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ तासवडे औद्योगिक वसाहतीतील सुमित घोलप यांच्या प्लॉटमध्ये चोरीछुपे सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर अचानक छापा टाकला.

यावेळी या कंपनीत सुमारे चार टन अशा लाखो रुपयांच्या बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या मिळून आल्या आहेत. फेक कंपनीच्या नावाने या प्लास्टिक पिशव्या बनवल्या जात होत्या. तासवडे औद्योगिक वसाहतीतील चोरीछुपे सुरू असलेल्या या कंपनीवर उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, तसेच क्षेत्र अधिकारी अर्चना जगदाळे यांनी अचानक छापा टाकून सुमारे चार टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.