अलिबाग : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. पुढील आदेश जारी होत नाही तोवर ही बंदी लागू राहणार आहे.
अवजड वाहनामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोर घाटात वारंवार अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका कंटेनरने २१ गाड्यांना धडक दिली होती. ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधीक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर बोर घाटातील तीव्र उतारावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न समोर आला होता. रायगडच्या पोलीस अधिकक्षांनी बोरघाट परिसरात होणाऱ्या अवजड वाहनांच्या अपघातांचा अभ्यास करून यामागील कारणांचा शोध घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना बोरघाट परिसरात अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता आहे. महामार्गावरील याच पट्ट्यात यापुर्वी अनेकदा अपघातांच्या घटनां घडल्या आहेत. अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना तसेच जनतेच्या सुरक्षिततेचे कारण पूढे करण्यात महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जावळे यांनी जारी केले आहेत. या कालावधीत बोरघाटातील अवजड वाहतूक मुंबई पुणे दृतगती मार्गावरून वळवली जाणार आहे.