अलिबाग: रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम १ जुलै ते १५ जुलै दरम्यान राबविण्यात आली. या मोहीमेत १४३ शाळाबाह्य तसेच २०४ स्थळांतरित मुले आढळून आली. या सर्वांना जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला असल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, नवोदय परिक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेसाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन सदर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शोध मोहिमेत ७७ मुले, ६६ मुली अशी एकूण १४३ शाळाबाह्य मुले सापडली असून, या सर्व मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. तसेच इतर जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेले १०५ मुले व ९९ मुली अशा २०४ मुलांनाही शाळेत दाखल करून घेण्यात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. सोमवार पासून ही सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होतील असा विश्वास शिक्षणाधिकारी दहितुले यांनी व्यक्त केला.