अलिबाग: किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग आज पासून बंद करण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.
गेल्या 24 तासांपासून रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. आंबा कुंडलिका आणि सावित्री नदीने धोका पातळी ओलांडल्याने नागोठणे रोहा आणि महाड परिसराला पूरस्थितीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिसूचना जारी केली.
पावसाळ्यात रायगड किल्ला आणि आसपासच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असतो. अशावेळी पायरी मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्याचबरोबर पायऱ्यांवरून पाण्याचे प्रवाह वेगाने वाहत असतात, ज्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हि बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज पासून 15 ऑगस्ट पर्यंत रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद केला आहे.
पर्यटकांनी या कालावधीत रोप वे मार्गाचा वापर करून गडावर जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने जाहीर केल आहे. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम मधील विविध कलम अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.