अलिबाग– रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात माथेरान, कर्जत, खालापूर, महाड, पोलादपूर, रोहा परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे सावित्री आणि कुंडलिका नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दोन्ही नद्या इशारा पातळीवरून वाहत असल्याने, महाड आणि रोहा परिसराला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने, नदी किनाऱ्यावरील गावे आणि डोंगर उतारावरील दरड प्रवण गावांना सतर्कतेचा इशारा जारी केली आहे.
जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माथेरान येथे सर्वाधिक २०१ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. या शिवाय पोलादपूर येथे १४५ मिमी, कर्जत येथे ११४ मिमी, म्हसळा येथे १०६ मिमी, पनवेल ९३ मिमी, पेण ९२ मिमी, खालापूर ९२ मिमी, महाड ९५ मिमी, सुधागड ८८ मिमी, माणगाव ६२ मिमी, रोहा ६८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
महाबळेश्वर आणि पोलादपूर खोऱ्यात अतिवृष्टी झाल्याने, पोलादपूर येथील रानबाजीरे धरणातून सावित्री नदीत सकाळी ५ वाजता १ हजार ३७७ घनमीटर प्रती सेंकदाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. अजूनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली . पहाटे पासूनच नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहर आणि लगतच्या परिसराला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाडमधील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. दस्तुरी नाका,गंधारिपुल,नातेखिंड,नांदगाव खुर्द,पोलादपूर बाजारपेठ हे रस्ते जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे..
दरम्यान, महाड शहरातील काही परिसरात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क झाले असून, संभाव्य पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्कालीन मदतीसाठी बचाव पथके तयार ठेवण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..
भीरा धरणातून विसर्ग सुरू असल्याने, कुंडलिका नदीही इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे रोहा शहर आणि आसपासच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजही पावासाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.