अलिबाग – खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडून बेपत्ता झालेल्या तीन मच्छीमारांचे मृतदेह सोमवारी सापडले, अलिबाग तालुक्यातील दिघोडे, सासवणे आणि किहीम येथे हे मृतदेह आढळून आले आहेत. मासेमारी बंदी लागू असतांना उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांची तुळजाई नावाची बोट शनिवारी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती.
समुद्र खवळलेला असल्याने, लाटांच्या तडाख्यात सापडून ही बोट बुडाली. त्यावेळी बोटीत एकून ८ मच्छीमार होते. बोटीतील पाच मच्छीमार पोहून किनाऱ्यावर आले होते. मात्र बोटीतील तीन मच्छीमार बेपत्ता होते, तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता.
तटरक्षक, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडून या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेत होते. शोध मोहीमेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली होती. मात्र तिघांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर सोमवारी तिघांचेही मृतदेह अलिबाग तालुक्यातील दिघोडे, सासवणे आणि किहीम येथे आढळून आले.
नरेश राम शेलार, धीरज काशिनाथ कोळी आणि मुकेश यशवंत पाटील या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलीसांनी पंचनामाकरून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले, त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
दरम्यान बोटीतून बचावलेल्या हेमंत बळीराम गावंड रा. आवरे, संदीप तुकाराम कोळी रा. करंजा, रोशन भगवान कोळी रा. करंजा, शंकर हिरा भोईर रा. आपटा, कृष्णा राम भोईर रा. आपटा या पाच जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.