अलिबाग – रायगड जिल्‍ह्यात आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण केंद्रांच्‍या वाटप प्रक्रियेत अनियमितता झाली असून चुकीच्‍या पद्धतीने केंद्राचे वितरण झाल्‍याचा संशय आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी व्‍यक्‍त केला आहे. पात्र अर्जदारांना डावलून काही ठिकाणी अपात्र अर्जदारांना आधार केंद्र देण्‍यात आल्‍याचा आरोप देखील करण्‍यात आला आहे.

यासंदर्भात आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेवून आपली भूमिका मांडली. आधार केंद्रांचे वाटप कसे चुकीच्‍या पद्धतीने झाले आहे हे लक्षात आणून दिले. त्‍यांच्‍या म्‍हणण्यानुसार आपले सरकार सेवा केंद्रचालक फक्‍त एकाच आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात त्‍यांच्‍या कुटुंबातील दुसरया व्‍यक्‍तीचा अर्ज आला असल्‍यास दोन्‍ही अर्ज ग्राह्य धरले जात नाहीत असा नियम आहे. असे असतानाही चुकीच्‍या पदधतीने एकाच कुटुंबातील दोन व्‍यक्‍तींना आधार केंद्राचे वाटप करण्‍यात आले आहे. ज्‍या ठिकाणी आधार केंद्रांची गरज नाही त्‍या ठिकाणीदेखील केंद्र मंजूर करण्‍यात आले आहेत.

अर्जदार शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असल्‍यास अपात्र ठरतो परंतु कर्जत तालुक्‍यात पोलीस पाटील पदावर कार्यरत महिला अर्जदाराला आधार केंद्र देण्‍यात आले आहे. आधार केंद्र वाटप प्रक्रियेत पात्र दिव्‍यांगांना प्राधान्‍य देण्‍यात आलेले नाही. एका दिव्‍यांगाने श्रीवर्धनसाठी अर्ज केला होता परंतु त्‍याने बोर्लीपंचतनसाठी अर्ज केल्‍याचे सांगून त्‍याचा अर्ज बाद ठरवण्‍यात आला आहे. अनेक ठिकाणी सेतू केंद्रावरील दाखल्‍यांची संख्‍या वाढवून दाखवण्‍यात आली असून त्‍या आधारावर अन्‍य आधार केंद्र मंजूर करण्‍यात आल्‍याचे आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आपल्‍या निवेदनातून निदर्शनास आणून दिले. जिल्‍हाधिकारी यांनी त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेवून योग्‍य ती कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे.

नागरीकांची गरज लक्षात घेवून रायगड जिल्‍हयात वाढीव आधार केंद्र सुरू करण्‍यात येत आहेत. आधार केंद्रासाठी रायगड जिल्‍ह्यातील २६८ जणांनी अर्ज केले होते. त्‍यातील ९९ केंद्रांना मंजुरी देण्‍यात आली असून प्रत्‍यक्षात ८१ ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे. उरलेल्या १८ केंद्रांचे काय झाले हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया संशयास्पद असल्याच आपले सरकार केंद्र चालकांचा दावा आहे.

आधार केंद्र वाटपातील अनियमितता आम्‍ही जिल्‍हाधिकारी यांच्‍या निदर्शनास आणून दिली आहे. आमचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर ज्‍या ठिकाणी चुकीच्‍या पदधतीने केंद्राचे वाटप झाले आहे ते तपासून चुकीचे असेल तर रद्द करण्‍यात येईल तसेच पात्र व्‍यक्‍तींना वाटप केले जाईल, आश्‍वासन त्‍यांनी दिले आहे. -स्‍वप्‍नील सोनावणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक