अलिबाग : जिल्ह्यातील महिला बचत गटाचे काम सांभाळणाऱ्या सर्व महिलांना जिल्हा नियोजन विकास निधीतून मोबाईल फोन दिले जातील. पुढील दोन महिन्यांत या मोबाईल फोनचे वितरण केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. ते नागोठणे येथे नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. तसेच जिल्ह्यातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते. रायगड पोलीस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला त्यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विशेष नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : “मराठा समाजाची मागणी चुकीची…”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत, सदावर्तेंनाही दिला सल्ला

आज महिलांना सक्षम करण्यासाठी आज अनेक योजना कार्यरत आहे पण त्याची माहिती त्यांना नसते त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी राहते ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले असल्याचं यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितलं. महिला अत्याचाराची घटना लक्षात घेऊन, रायगड पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करावेत आणि शाळा आणि महाविद्यालयातील मुलींना सात दिवसांचे स्वसंरक्षणाचे धडे द्यावे. हे प्रशिक्षण कराटे पुरते मर्यादित न ठेवता महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती या माध्यमातून दिली जावी. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करण्यात यावी, शाळांकडून या प्रशिक्षणासाठी मुलींना सक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.

हेही वाचा : “गाडी फोडण्याची शिक्षा कमी, सदावर्तेंना संपवायला हवं होतं, कारण…”; संजय गायकवाडांचं वादग्रस्त वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवदुर्गा सन्मान विजेत्या…

यावेळी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भक्ती साठेलकर, मानसोपचार तज्ञ स्वराली कोंडविलकर, व्यवसायिका राजश्री जाधव, वकील गीता म्हात्रे, डॉक्टर फराह अबुल कलाम जलाल, गृह उद्योजिका स्नेहा कासार, मेट्रो पायलट गार्गी ठाकूर, समाजसेविका इशिका शेलार, पोलीस पाटील मानसी मनसोळे यांना सन्मानित करण्यात आले.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान…

पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस अंमलदार साजिया कप्तान, पोलीस हवालदार नेहा जाधव, सुवर्णा खाडे, छाया कोपनर, आरती राऊत, आरती सांगळे, लतिका गुरव, प्रियंका भोगावकर, संगीता पडते यांना सन्मानित करण्यात आले.