अलिबाग- रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या तिन्ही तालुक्यात चोवीस तासात ३०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुरुड येथे ३७१ मिमी, श्रीवर्धन येथे ३०८ मिमी, तर म्हसळा येथे ३०० मिमी, माथेरान येथे १८१ मिमी, रोहा १६६मिमी, सुधागड १०४ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे कुंडलिका, पाताळगंगा, आंबा, सावित्री नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर कोझर येथे मोठं भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी गेली वाहून गेली आहे. तर रस्ता खचला आहे. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हसळा गोरेगाव मार्गावर खामगाव इथं भलंमोठं झाड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्रवाशांनी माणगाव घोणसे घाट मार्गे प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

मान्सून तळकोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अलिबाग उरण परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे. महाड, पोलादपूर , माणगाव, रोहा परिसरात रविवारी संध्याकाळ पासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

पेण खोपोली मार्गावर पहाटेच्या सुमारास साजगाव इथं रस्त्यात भलं मोठं झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. खोपोली नगर पालिका अग्निशमन विभाग आणि हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मेहनत घेऊन झाड कापून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुरूड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुरूड शहराच्या दत्त मंदिर परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळी पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले आणि पाण्याचा प्रवाह पायरी मार्गाने खाली उतरला . यामुळे रस्त्यावर पाणी साचले अनेकांच्या घरात देखील पाणी शिरून नुकसान झाले. दत्त मंदिर परीसरात डोंगर फोडून भराव करण्यात आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पहिल्यांदाच ही वेळ ओढवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.