अलिबाग– रायगड जिल्हा परिषद आणि १५ पचांयत समित्यांसाठी अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेसाठी ५९ प्रभाग आणि पंचायत समित्यांसाठी ११८ प्रभाग रचना कायम राहिली आहे. २०१७ प्रमाणे यावेळीही प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे.
२०२२ मध्ये जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी २०२१ ची संभाव्य जनगणना लक्षात घेऊन प्रभाग रचना करण्यात आली होती. नवीन प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी संख्या ६६ तर पंचायत समितीच्या प्रभागांची संख्या १३२ होणार होती. म्हणजेच जिल्हा परिषदेचे प्रभाग संख्या सात ने तर पंचायत समितीच्या प्रभागांची संख्या १४ ने वाढणार होती. मात्र कोविड काळामुळे २०२१ ची जनगणना झालीच नाही. त्यामुळे या प्रभाग रचनांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा २०११ ची जनगणना ग्राह्य धरून प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग कायम राहीले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा विचार न करता निवडणूका तातडीने घ्याव्यात असे आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि ही अधिसूचना जाहीर झाली आहे. प्रारुप आदेशाच्या प्रती जिल्ह्यातील सर्व तहसिलदार कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयात पहायला मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्हा परिषद मतदारसंघ आकडेवारी
पनवेल तालुक्यात सर्वाधिक ८ मतदारसंघ आहेत. अलिबाग तालुक्यात ७ तर कर्जत तालुक्यात ६ मतदारसंघ आहेत. पेणमध्ये ५ , महाडमध्ये ५ , खालापूर ४ , रोहा ४ , उरण ४ , माणगाव ४ , सुधागड २ , मरुड २ , तळा २ , म्हसळा २ , पालदापूर २, श्रीवर्धनमध्ये २ अशी मतदारासंघ विभ्गणी आहे.
तलुकानिहाय मतदारसंघ
- पनवेल : वावंजे, नेरे, पालीदेवर, पळस्पे, वावेघर, वडघर, गव्हाण, केळवणे
- कर्जत : कळंब, कशेळे, माणगाव तर्फे वरेडी, नेरळ, कडाव, मोठे वेणगाव
- खालापूर : चौक, वासांबे, सावरोली, आत्करगाव
- सुधागड : जांभूळपाडा, राबगाव
- पेण : जिते, दादर, वडखळ, महालमिर्या डोंगर, शिहू
- उरण : नवघर , जाणजे, जासई, चिरनेर,
- अलिबाग : शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, चौल, कावीर,
- मुरूड : कोर्लई, राजपूरी
- रोहा : नागोठणे, आंबेवाडी, भुवनेश्वर, घोसाळे
- तळा : चरई खुर्द, रहाटाड
- माणगाव : निजामपूर, तळाशेत, मोर्बा, गोरेगाव,
- म्हसळा : पाभरे, पांगळोली
- श्रीवर्धन : बोर्लीपंचतन, आराठी
- महाडः बिरवाडी, खरवली, दासगाव, करंजाडी, नडगाव तर्फे बिरवाडी
- पोलादपूर : कापडे बुद्रुक, लोहारे