सांगली : गेल्या आठ दिवसांपासून अचानक येणाऱ्या पावसाने जिल्ह्याचे कोकण समजल्या जात असलेल्या शिराळा पश्चिम भागातील भाताची सुगी अडचणीत आली आहे. कोरड्या हवामानाच्या अभावाने यंदाची भाताची सुगी नुकसानकारक ठरली आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात चांदोली, पणुंब्रे, आरळा परिसरात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. यावर्षी लवकर सुरू झालेल्या पावसाने धुळवाफेवर भात पेरणी होऊ शकली नसली तरी शेतकऱ्यांनी पडत्या पावसात भाताची लागण केली. काही ठिकाणी रोप लागण तर काही ठिकाणी बी-टोकण करून भाताची लागण केली. सततच्या पावसाने भात खाचरात पाणी साचले असले तरी याचा भात पिकावर फारसा प्रतिकूल परिणाम झालेला नाही.

दिवाळीपर्यंत भात पीक तयार झाल्याने सध्या काढणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. यातच गेल्या आठ दिवसांपासून शिराळा तालुक्यात अधूनमधून पावसाची सर येत असल्याने भात कापणी आणि मळणीची कामे पूर्ण करणे जिकिरीचे बनले आहे. भात कापणीसाठी आठ ते दहा मजूर कामासाठी घ्यावे लागतात, ज्याप्रमाणे भात कापणी होईल तशी मळणीसाठीही शेतमजुराची तयारी करावी लागते. रानात काढून ठेवलेला भात गोळा करणे, मळणी यंत्रासाठी भाताच्या पेंड्या देणे यासाठी मानवी हाताची गरज भासते. सगळी जुळणी झाली आणि मळणी सुरू केली तर अचानक पावसाचे आगमन होत असल्याने मळणी थांबवावी लागत आहे. यातच रानात कापणी करून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्या भिजत असल्याने तयार भाताची गुणवत्ताही कमी होत आहे. भिजलेल्या भाताची मळणीही कठीण झाली आहे. यामुळे शेतकरी सलग पडत असलेल्या पावसाने त्रस्त झाले आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतातील आणि खळ्यावर ठेवलेला भात पूर्णत: ओला होत आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेलं पीक पाण्याखाली गेले असून, मळणीसाठी आणलेला भात पावसाने भिजला आहे.

ज्या शेतांमधून वाहनांच्या साहाय्याने भाताची वाहतूक सुरू होती ती ठिकाणे आता चिखलमय झाली आहेत. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे. शेतात उभे असलेले पीक पावसाच्या झडीमुळे जमिनीवर आडवे होत आहे. त्यामुळे कापणीचं काम अधिक अवघड बनले आहे. पावसाच्या या ऊन-पावसाच्या खेळात शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच भिजलेल्या डोंगरातून जमिनीला नीर लागले असल्याने पावसाने उभ्या पिकात लगेच पाणी साचत आहे. तयार भात भिजत असल्याने त्यांची प्रतवारीही खराब होत आहे.