परभणी : गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर काल सोमवारपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान पुढचे तीन दिवस वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाचे असल्याने हा पाऊस जिल्ह्यातल्या खरीप हंगामाला संजीवनी देणारा ठरणार आहे.
सोमवारी (दि.७) सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. दिवसभरात फार जोरदार पाऊस झाला नसला तरी अधून मधून रिमझिम कायम होती. या पावसाचा खरीपाच्या पेरणीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांच्या खंडानंतर पावसाने पुन्हा एकदा बरसायला प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात बहुतांश पेरण्या गेल्या आठवड्यातच आटोपल्या आहेत. पावसाअभावी कुठेही पेरणी शिल्लक राहिलेली नाही. अशावेळी झालेल्या पेरण्यांना संजीवनी मिळण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. सध्या जिल्ह्यात भीजपाऊस सुरू झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आज मंगळवारी सकाळपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात कापूस, सोयाबीनची पेरणी झाल्याने ही पिके आता वाढीला लागली आहेत. अजून दमदार पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीसाठी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. पुढच्या तीन दिवसात पावसाचा अंदाज असल्याने व सध्या पूर्णपणे पावसाचे वातावरण बदलल्याने जिल्ह्यात समाधानकारक पावसाला प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी या पावसाची नितांत गरज असून या पावसाळ्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही.
यंदाचा पावसाळा अजूनही म्हणावा तसा सुरू झालेला नाही. जलसाठ्यांमधले पाणी वाढण्यासाठी तसेच विहिरी, तलाव भरण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अजूनही विहिरींना पाणी आलेले नाही. ज्याला खडा फुटणे असे म्हणतात तो पाऊस अजूनही झालेला नाही. आतापर्यंत झालेला पाऊस हा भिजपाऊस असल्याने वाढीला लागलेल्या पिकांना त्याचा उपयोग होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने शिडकावा दिला तर कुठे तो रिमझिम बरसला. सर्वदूर पावसाचे वातावरण निर्माण झाले असले तरी दमदार व ठोक अशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. या पावसाळ्यात ओढे, नदी, नाल्यांना पूर येईल असा पाऊस अद्याप झालेला नाही. भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्हयाकरिता बुधवारपर्यंत (दि.९) या कालावधीत पिवळया रंगाचा सावधानतेचाइशारा देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.