अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ३ हजार २९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत १०६ टक्के आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही समाधान कारक पाऊस पडला. त्यामुळे पावसाने तीन महिन्यातच वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी गाठली आहे. सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा…सोलापूर : राजकीय नेत्याला धमकावत खंडणी मागण्याचा प्रकार, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार १०१ मिलीमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत ऑगस्ट अखेर पर्यंत सरासरी ३ हजार २९५ झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट अखेर पर्यंत ३०० मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे.
अलिबाग २ हजार ७६९ मिमी, मुरुड २ हजार ५८५ मिमी, पेण ३ हजार १७४ मिमी, पनवेल ३ हजार ०३९ मिमी, उरण २ हजार ४४४ मिमि, कर्जत ३ हजार ६८४ मिमी, खालापूर ३ हजार ५२२ मिमी, सुधागड ३ हजार ६५८ मिमी, रोहा ३ हजार २४६ मिमी, माणगाव २ हजार ७८१ मिमी, तळा ३ हजार ७०८ मिमी, महाड ३ हजार ३४० मिमी, पोलादपूर ३ हजार ७४८ मिमी, म्हसळा ३ हजार ४२३ मिमी, श्रीवर्धन २ हजार ६४४ मिमी, माथेरान ४ हजार ९६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे, लघुपाटबंधारे विभाग प्रकल्प पूर्ण क्षमतेनी भरली आहेत.