गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली आहे. यानंतर आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १८ जिल्ह्यांना पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे.

बुधवारी (२७ जुलै) कमी-अधिक प्रमाणात राज्यात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, गुरुवारनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी हवामान खात्याने पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ११ जिल्ह्यांना पिवळा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, २९ आणि ३० जुलै रोजी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मनीपूर, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.