९ धरणे शंभर टक्के भरली…

अलिबाग- मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणी साठा जमा झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे ९ धरणे शंभर टक्के भरली आहे.

जिल्ह्यात यंदा दहा दिवस आगोदरच मॉन्सूनचे आगमन झाले होते. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. जून महिन्याचे सुरवातीचा आठवडा कोरडा गेला मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे नद्या नाले प्रवाहीत झाले आहेत. धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

रायगड जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे आहेत. ज्यापैकी ९ धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहेत. २ धरणांमध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ५ धरणांमध्ये पन्नास टक्केहून अधिक पाणी साठा असून, १२ धरणांमध्य ५० टक्के पेक्षा कमी पाणी साठा आहे. सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरे ही धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. फणसाड आणि वावा ही धरणेही लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडकरांची जल चिंता मिटली आहे.

कार्ले, कुडकी, अवसरे, कलोते मोकाशी आणि डोणवत धरणांमध्ये ५० टक्केहून अधिक पाणी साठा जमा झाला आहे. आंबेघर, श्रीगाव, घोटवडे, ढोकशेत. कवेळे, रानवली, साळोख, मोरबे, बामणोली, उरण, पुनाडे आणि वरंध या धरणांमध्ये अद्याप ५० टक्के पेक्षा कमी पाणीसाठी आहे. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या काही दिवसात ही धरणेही पूर्ण क्षमतेनी भरण्याचा विश्वास पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ प्रकल्पांची साठवण क्षमता जिल्ह्यातील धरणांची एकूण साठवण क्षमता ६८.२६१ दशलक्ष घनमीटर येवढी आहे. त्यात सध्या ४०. ६२२ दशलक्ष घनमीटर पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या ६० टक्के पाणी साठा धरणांमध्ये जमा झाला आहे. पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.