मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात मुलाखत झाली. शहर नियोजनात स्थापत्यकलेचं किती महत्त्व असतं? या विषयावर त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. मात्र, त्याचवेळी मुंबई, पुणे या शहरांच्या नियोजनात सरकार कशा प्रकारे कमी पडत आहे, त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी सरकारी व्यवस्थेकडून आर्किटेक्ट्सला योग्य ते सहकार्य मिळत नसल्याबाबत राज ठाकरेंनी मुलाखतकारांकडून विचारणा करण्यात आली असता त्यांनी २००६ साली घडलेला एक प्रसंग सांगितला आणि उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी यावेळी स्थापत्यशास्त्राविषयी प्रशासकीय व सरकारी पातळीवर कशा प्रकारे अनास्था दाखवली जाते, या मुद्द्यावर भाष्य केलं. सरकारी पातळीवर नियोजनाविषयीच अनास्था असल्यामुळे या बाबी घडत असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. त्यासाठी त्यांनी एका सर्किट हाऊसचंही उदाहरण दिलं. “त्या सर्किट हाऊसमध्ये मी शिरलो असता बेडरूम म्हणजे एक मोठा हॉलच असल्याचं मला दिसलं. आणि त्याच्या मधोमध त्यांनी बेड ठेवला होता. आता एखादं नवविवाहित दाम्पत्य तिथे गेलं तर त्या बेडच्या भोवती काय त्यांनी पकडा पकडी खेळायची आहे का?” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

“माझी गॅरंटी देईन, बाकीच्यांची कशी देऊ?”

दरम्यान, शासकीय स्तरावर आर्किटेक्ट्सला योग्य तसं सहकार्य मिळत नसल्याची बाब मुलाखतकारांनी विचारली असता त्यावर राज ठाकरेंनी २००६ साली घडलेला एक प्रसंग सांगितला. “त्यांना तुमच्याबद्दल किती आस्था असेल, हे मला माहिती नाही. मी माझी गॅरंटी देऊ शकतो, मी बाकीच्यांची काय गॅरंटी देऊ शकतो”, असं राज ठाकरे म्हणाले.

“वाजपेयींचा सुरक्षा अधिकारी मला म्हणाला…”

“हे लोक कशा प्रकारे विचार करतात याचं एक उदाहरण सांगतो. बाळासाहेब ठाकरेंची एक फोटो बायोग्राफी मी २००६ साली प्रकाशित केली होती. या लोकांची विचार करण्याची प्रक्रिया कशी असते बघा. त्या कार्यक्रमासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर स्टेज बांधलं होतं. त्याच्यासमोर सगळे प्रेक्षक बसणार होते. अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. माजी पंतप्रधान म्हणजे त्यांना सर्व सुरक्षाव्यवस्था वगैरे असते. त्यामुळे ते सगळे सुरक्षारक्षक दिल्लीवरून आले होते”, असं राज ठाकरे म्हणाले. त्यातील एका अधिकाऱ्यानं त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी यावेळी टिप्पणी केली.

“हल्ली पाच पाच पुणे झाले आहेत, कुणाचा काही…”, राज ठाकरेंचं मुलाखतीत परखड भाष्य; म्हणाले, “हे शहर बरबाद व्हायला…!”

“त्यातला एक मुख्य अधिकारी माझ्याकडे आला. बाजूला बघून मला म्हणाला ‘ये क्या है?’ मी म्हटलं ‘ये ताज हॉटेल है’. मग म्हणाला ‘अच्छा.. ये तो डेंजरस है’. मी म्हटलं ‘म्हणजे?’ तर म्हणतो ‘इसे ढकना होगा’. मी म्हटलं ‘अरे काय माझ्या बापाची मिल आहे का? ढकना होगा म्हणजे काय?’ ताज हॉटेलची इमारत झाकायची कशी? पण त्याच्या मनात आलं ही झाकली पाहिजे. हा विचार येतो कुठून? मग मी तिथे काही लाईट वगैरे काहीतरी सोय केली जेणेकरून हॉटेलमधून त्यांना कार्यक्रम स्थळाचा काही व्यू मिळणार नाही”, असा किस्सा राज ठाकरेंनी यावेळी सांगितला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एक हॉटेल मला कपड्यानं झाकायला सांगत होते”

“एक हॉटेल कपड्यानं झाका असा विचार मनात कसा येतो? त्यांच्याबरोबर तुम्हाला राहायचंय. आर्किटेक्चरमधला अप्रतिम नमुना झाकायला सांगतायत म्हणजे बघा”, असंही राज ठाकरे शेवटी म्हणाले.