येत्या एक मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. मशिदींवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिकेवरून राजकारण सुरू झालेलं असतानाच आता पुन्हा राज ठाकरे औरंगाबादमधून नेमकी कोणती भूमिका मांडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्याचवेळी या सभेमध्ये जातीय तेढ निर्माण होणारं भाषण होऊ शकतं, असा आक्षेप नोंदवत सभेविरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी १६ अटींच्या आधारावर परवानगी दिली आहे. या अटींमध्ये सभेसाठीच्या निमंत्रितांचा आकडा, जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य टाळणे, सभेत गोंधळ झाल्यास आयोजकांची जबाबदारी अशा अनेक अटींचा समावेश करण्यात आला आहे. सभेला १५ हजार लोकांनाच निमंत्रित करता येऊ शकेल, अशी अट पोलिसांनी घातली असली, तरी येणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी आधीच मोठी गर्दी होण्याचे संकेत दिले आहेत.

नांदगावकरांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन

दरम्यान, आज झालेल्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका मांडली. “शांतपणे गाडीत यायचं आणि तसंच शांतपणे परत जायचं. कुठेही गडबड करायची नाही. पोलिसांना मदत करायची आहे अशा सूचना कार्यकर्त्यांना आहेत”, असं बाळा नांदगावकर म्हणाले. तसेच, “शांतपणे या, शांतपणे जा.. गडबड गोंधळ होता कामा नये”, असं देखील नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटी मनसे पाळणार का? बाळा नांदगावकर म्हणतात, “येणाऱ्या लोकांना तुम्ही…!”

“आपल्याला वाद नकोय”

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणाऱ्यांना उद्देशून देखील बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. “त्यांच्या विरोधाचं कारण मला माहिती नाही. पण आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्ही शिवजयंती, आंबेडकर जयंती जोरात साजरी केली. आत्ताही आम्ही आनंदाने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस सक्षम आहेत. पोलिसांना सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे. पण आपल्याला वाद नकोय. आपल्याच लोकांसोबत आपण वाद काय घालायचा? पोलीस प्रत्येक गोष्टीची काळजी घेतील”, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर सशर्त परवानगी; निमंत्रितांचा आकडा, चिथावणीखोर वक्तव्य याबाबत अटींचा समावेश!

“आम्ही कुठे म्हटलो युती करा?”

न करण्यात आलेली विधानं नव्या चर्चेला उधाण देत असताना त्याबाबत बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली आहे. “आम्ही भाजपाला म्हटलोच नाही की युती करा. त्यांचा अजेंडा वेगळा आणि आमचा अजेंडा वेगळा”, असं ते म्हणाले.