Raj Thackeray shown Narendra Modi video Criticizing Election Commision : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा नुकताच गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी आयोगाला सांगितलं की “मतदार याद्यांमधील घोळ मिटत नाहीत तोवर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका. यासाठी एक वर्ष गेलं तरी आमची थांबण्याची तयारी आहे. पाच वर्षे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी एक वर्ष थांबू.”

मनसे अध्यक्ष म्हणाले, “महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत. त्यामुळे तुम्ही मतदान करा, अथवा नका करू, निवडणुकीचा निकाल आधीच ठरला आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला मतदारयाद्या दुरुस्त करायला सांगत आहोत. मात्र यावर सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत तेच कळत नाही. ते चिडतायत कारण ही गोष्ट कुठेतरी त्यांना लागतेय.

“आमचे प्रश्न आयोगाला, मग सत्ताधारी का चिडतायत? कारण त्यांनी शेण खाल्लंय”

राज ठाकरे म्हणाले, “आमचे प्रश्न निवडणूक आयोगासाठी आहेत. मग तुम्हाला राग का येतोय? कारण तुम्ही शेण खाऊन ठेवलं आहे. सर्वांना माहिती आहे की तुमच्याकडे राज्यात व केंद्रात जी सत्ता आली आहे ती तुम्ही कशी मिळवली आहे. तुमचं काय राजकारण चालू आहे ते जनतेला समजू लागलं आहे.

मी आज बोलतोय ते सत्ताधारी याआधी बोलायचे : राज ठाकरे

“हीच माणसं (सत्ताधारी) आधी विरोधी पक्षात असताना आज मी जे बोलतोय तेच बोलत होती. मी तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं एक भाषण दाखवतो. आज मी जे काही बोलतोय तेच मोदी काही वर्षांपूर्वी बोलत होते. त्यांचं हे आसामच्या निवडणुकीमधील भाषण आहे. हे भाषण केलं तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.”

आसामच्या सभेत नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

“मी आज सार्वजनिकपणे भारताच्या निवडणूक आयोगाला इशारा देतो की निवडणूक आयोगामध्ये एक अंपायर म्हणून निष्पक्षपणे आगामी निवडणुका घेण्याची हिंमत असेल तर मी जे बोलतोय ते लक्षपूर्वक ऐका. भाजपा कार्यकर्त्यांना, आयोगाच्या कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की माझं भाषण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवा. गुजरातमध्ये शांततेत निवडणूक झाल्या म्हणजे त्याचं श्रेय निवडणूक आयोगाला जात नाही, मात्र, महाराष्ट्र, बिहार, बंगाल अशा राज्यांमध्ये निवडणुका शांततेत होतात, तेव्हा त्याचं श्रेय निवडणूक आयोगाला जातं. आमच्या लोकांवर खोटे खटले लावले जात आहेत. तुम्ही तुमचं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडा.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की “मी काही मतदारसंघांची नावे घेतली होती, बंगाल, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये अघटित घडेल असं म्हटलं होतं. शांततेत निवडणुका पार पाडणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही का? की निवडणूक शांततामय होणार नाही. पंतप्रधानांपेक्षा तुमच्याकडे जास्त अधिकार आहेत. तर मग तुम्ही काहीच करत का नाही? माझं बोलणं वाईट वाटत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा. पण निष्पक्ष निवडणूक घेणं तुमचं कर्तव्य आहे. मी खूप गंभीर आरोप करत आहे. कारण लोकशाहीत असं चालत नाही. ३० तारखेच्या निवडणुकीत गडबड झाली आहे.”