Raj Thackeray Slap Boss Statement: मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर ईव्हीएममधील कथित गैरप्रकारांविरोधातील सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या सादरीकरणानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मोर्चा होणार आहे. या मोर्चात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना राज ठाकरे यांनी, “सुट्टीची कारणे देऊ नका, बॉसला एक मारा पण मोर्चाला या”, असे अजब आवाहन केले.

…तर बॉसला एक मारा

निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मतदारांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी या मोर्चात सहभागी व्हावे. महाराष्ट्रात काय प्रकारचा राग आहे, तो या मोर्चातून दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी तुम्हाला मोर्चात यावे लागेल. नोकरीची कारणे देऊ नका. बॉस सुट्टीसाठी नाही म्हणाला तर त्याला एक मारा. शनिवारपुरते एक मत त्याच्या गालावरही द्या. मला वाटते तुमचा बॉसही मतदारच असेल, त्यालाही मोर्चाला घेऊन या. हे जे चालले आहे, ते महाराष्ट्रातील आणि देशातील मतदारांचा अपमान आहे.”

सभांना गर्दी होते, पण…

सभांना गर्दी होते पण, त्याचे मतात रुपांतर होत नाही याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मी गेली अनेक वर्षे हे ओरडून सांगतोय. मागे आपले शिबिर झाले तेव्हाही मी सांगितले होते की, लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण हे (मतचोरी आणि ईव्हीएम छेडछाड) जे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू झाले आहे, या भानगडींमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटेल की, मी कारणे देतोय. कारणे काय द्यायची आहेत, याबाबत अख्खा देश बोंबलत आहे.”

निवडणुकांतील गैरप्रकारांची मॅच फिक्सिंगशी तुलना

यावेळी निवडणुकांतील गैरप्रकारांची मॅच फिक्सिंगशी तुलना करताना राज ठाकरे म्हणाले की, “आपल्या क्रिकेटमध्ये ज्यावेळी मॅच फिक्सिंग झाले होते, त्यावेळी अझरुद्दीन ते जडेजापर्यंत सर्वांना काढून टाकले. पण इथे कोणालाच काढत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात की, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज प्रायव्हेट असतात. यात प्रायव्हसी कसली आली? जी पटत नाहीत अशी काहीतरी उत्तरे द्यायची आणि या सर्व भानगडीतून निवडणुका घ्यायच्या. यातून सत्तेत आल्यानंतर वेडेवाकडे आणि कसेही वागायचे.”