स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गाला(ओबीसी) २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तर, राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं असा भाजपाकडून आरोप केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलताना एक मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. “अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

पत्रकारपरिषदेत या संदर्भात विचारण्यात आलेल्य प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने यांना मोजणी करायला कशी काय सांगितली. मग कोर्टात याविरोधात कसा काय निर्णय आला? हे काही इतकं दिसतं तेवढं सरळ नाही प्रकरण. तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा हा विषय बोललेलो आहे की, आपण जोपर्यंत जातीपातीमधून बाहेर येणार नाही. तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्टी, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे. मुख्य विषय सगळे बाजूला पडतात आणि कसंय कुठल्याही गोष्टीची उत्तर तुम्हाला सापडतच नाहीत. आजही मला सापडलेलं नाही की मुकेश अंबानीच्या घराखाली गाडी ठेवली ती कशासाठी? काही कळलं का तुम्हाला त्यामधून? कोणालाच काही कळालं नाही. मी माझ्या पत्रकारपरिषदेत बोललो होतो, की हा विषय राहील बाजूला आणि प्रकरण भलतीकडे जाईल. मग ती गाडी ठेवली कशासाठी? काय हेतू होता? कोणी करवलं ते? ते राहीलं बाजूला देशमुख आत.”

तसेच, याप्रसंगी राज ठाकरे यांनी एसटी कर्मचारी संप, परीक्षांमधील गोंधळ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हिंदुत्वाबद्दलचं विधान आदी मुद्य्यांवरील प्रश्नांवर देखील आपली भूमिका स्पष्ट केली.

“लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही ” ; राज ठाकरेंचा अनिल परबांवर निशाणा!

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या आणि कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल परब यांच्यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी राज्य दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.