महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) एक निवेदन जारी करत राज्यात सुरू असलेल्या लहान मुलांच्या वेठबिगारीवर चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने तत्काळ या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडाही शिकवतील, असा सूचक इशारा दिला. राज ठाकरेंनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.”

“पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी हे भीषण”

“नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं, तरी ही प्रथा अस्तित्वात आहे आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यावेत”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तत्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.”

“वेठबिगारी निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी”

“पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

हेही वाचा : स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी करा, राज ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठच चोळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर अशांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील”

“गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा,” असं म्हणत राज ठाकरेंनी वेठबिगारी करून घेणाऱ्यांना सूचक इशाराही दिला.