राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कारवर आज (२ डिसेंबर) अज्ञातांनी दगडफेक केली. भाजपा नेते बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक झाल्याचं म्हटलं जातंय. याबाबत बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच राजेश टोपेंनी आमच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

बबनराव लोणीकर म्हणाले की, जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरू होती. संचालक निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची चर्चा सुरू होती. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर, अजित पवार गटाचे अरविंद चव्हाण, राष्ट्रवादीचे राजेश टोपे तेथे उपस्थित होते. पाच तास चर्चा झाली. चर्चा बिनविरोध झाली. पुढे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी माझ्या बंगल्यावर राजेश टोपे पाच – सहा तास बसले.

“भाजपा, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या तीन पक्षांत ही बैठक झाली. परतूर, मंठा या दोन तालुक्याला या बँकेचं उपाध्यक्षपद द्यायचं, असं ठरलं होतं. परंतु, ऐनवेळेला राजेश टोपेंनी पलटी मारली, विश्वासघात केला. त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. आमच्या भाजपा कार्यकर्त्यांची तक्रार आहे की, त्यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून या गोष्टी घडल्या”, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

हेही वाचा >> राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला, दगड आणि ऑइल फेकले; लोणीकरांचा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता जिल्हा शांत राहिला पाहिजे. त्यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असतील तर दुरुस्त करून देऊ. परंतु, जिल्ह्यांत भाजपा आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण करायचा असेल तर आम्ही केव्हाही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहे” , असा इशाराही त्यांनी दिला.