आगामी निवडणुकीसाठी नवे मित्रपक्ष जोडण्यावर भर दिला जात आहे. खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेऊन राज्यात विरोधकांची महाआघाडी केली जाणार आहे, अशी घोषणा काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी हातकणंगले- शिरोळ येथे झालेल्या जाहीर सभेत केली. खासदार राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात आल्यावर अनेक वक्त्यांनी त्यांना आघाडीची साद घातली. याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, आमची आणि राजू शेट्टी यांची शेतकऱ्यांविषयी भूमिका एकच आहे. शेतमालाला हमी भाव, खत, बियाणे, इंधन आदींची वाढ याविषयी आमचे एकमत असताना आता भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही.

स्वतः शेट्टी यांनी भाजपबरोबर गेलो ही चूक झाली असे सांगितले आहे. राजू शेट्टी यांनी राहुल गांधी यांचीही भेट काही दिवसांपूर्वी घेतली. सरकार विरोधात वातावरण तयार होते आहे. याचा स्थानिक पातळीवर फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे जनसंघर्ष यात्रा परिवर्तनाची नांदी झाली पाहिजे याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पायात पाय अडकावल्याने काँग्रेसवर जनसंघर्ष करण्याची वेळ आल्याची कबुली देऊन आता हातात हात घालून काम करावे लागेल, असाही टोला त्यांनी लगावला.

ऐक्याची गाणी आणि उमेदवारीची घोषणा

हातकणंगले- शिरोळ तालुक्यात झालेल्या सभावेळी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिलजमाई झाल्याचे वारंवार सांगितले. आमदार सतेज पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी काँग्रेस मध्ये ऐक्य निर्माण झाल्याने निवडणुकीत यश मिळेल, असा दावा केला. याचवेळी राजू आवळे (हातकणंगले), प्रकाश आवाडे (इचलकरंजी) व गणपतराव पाटील (शिरोळ) यांची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा करून प्रचाराचा नारळ श्री क्षेत्र नृसिहवाडी येथे फोडला.