राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली. डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने राजकीय आरक्षण रद्द झाल्याने संतप्त भावना असलेल्या इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. या घोषणेबरोबरच मागील काही महिन्यांपासून सातत्याने महाविकास आघाडीविरोधात आंदोलने, पत्रकार परिषदा आणि दौरे करुन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठवणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. असं असलं तरी आता किरीट सोमय्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यावरुन राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची फिरकी घेतलीय.

नक्की वाचा >> “भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी केली, राजे फडणवीसांना भेटले व पाठिंब्यासाठी…”; राज ठाकरेंचाही उल्लेख करत शिवसेनेचा हल्लाबोल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्यांचा एक हसरा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींनी त्यांच्यावर उपहासात्मक टीका केलीय. “तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो मिटकरींनी ट्विट केलाय.

दरम्यान, भाजपाने तिसरा उमेदवार रिगणात उतरविल्याने शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असेल. भाजपाचे गोयल यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विवेक महात्मे या तीन खासदार निवृत्त होत आहेत. गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली. सहस्त्रबुद्धे आणि डॉ. महात्मे यांना भाजपने फेरउमेदवारी देण्यात आलेली नाही. यापैकी डॉ. सहस्त्रबुद्धे हे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान कायम राहिल.

नक्की वाचा >> “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”; संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचा छत्रपतींच्या घराण्याला सल्ला

बोंडेंच्या माध्यमातून ओबीसी कार्ड
भाजपाने दुसऱ्या जागेसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपाच्या कृषी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. आक्रमक अशी प्रतिमा असलेले डॉ. बोंडे हे गेले दोन वर्षे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेहमी आक्रमकपणे बोलत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. कुणबी समाजातील डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपने ओबीसी समाजाचे कार्ड वापरले आहे.

इतर राज्यांमधून कोण?
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पुन्हा कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११ जागा रिक्त होत आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची मुदत संपुष्टात येत असली तरी रविवारी जाहीर झालेल्या यादीत नक्वी यांचा समावेश नाही. तसेच, सध्या राज्यसभेतील प्रतोद शिवप्रताप शुक्ल यांचेही नाव सहा उमेदवारांच्या यादीत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha election 2022 amol mitkari tweet about kirit somaiya scsg
First published on: 30-05-2022 at 08:56 IST