राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे गेले काही दिवस पक्षावरील त्यांच्या नाराजीची आणि संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा पुन्हा सुरू  झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्य़ात पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. छत्रपतींचे वारस शिवेंद्रराजे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्यापाठोपाठ विधान परिषदेचे सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची देखील भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यामध्ये कोण कोण नेते उपस्थित राहणार याकडे अनेकांचे लक्ष होते. यामध्ये वरील तीनही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची पक्षावरील नाराजीची आणि त्यांच्या पक्षांतरांची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रे’चा बुधवारी रात्री साताऱ्यात प्रवेश झाला. परंतु या यात्रेला जिल्ह्य़ातील केवळ आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील हे तीनच नेते उपस्थित होते. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांची संख्याही एरवीच्या तुलनेत खूपच कमी होती. नेत्यांची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ या साऱ्यांमुळे राष्ट्रवादीची गाजावाजा केलेली ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ यथातथाच पार पडली.

दरम्यान, पक्षावर नाराज असलेले सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत या सर्वाचा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे पक्षातील काही नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram raje udayan raje absent shiva swarajya yatra abn
First published on: 30-08-2019 at 01:47 IST