कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदाचा नुकताच राजीनामा दिलेल्या राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे अचानक भेट देण्यासाठी पोहोचल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे “रोहित पवार यांना राम शिंदेंचा राजकीय धक्का?” अशी चर्चा रंगू लागली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर शरद पवार समर्थक म्हणून ओळख असलेले राजेंद्र फाळके यांनी नुकताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. राम शिंदे हे थेट फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी आज सकाळी भेट देण्यासाठी आले. यावेळी त्यांनी दिवाळीचा फराळ स्वीकारत फाळके कुटुंबीयांसोबत चहापान केले. त्यानंतर फाळके यांचे मोठे बंधू शिवाजीराव फाळके यांच्या हस्ते प्रा. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीत भारतीय जनता पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय पातळीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, या भेटीचा परिणाम भविष्यातील राजकीय समीकरणांवर पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार यांचे एकनिष्ठ समर्थक मानले जाणारे राजेंद्र फाळके यांचे रोहित पवार यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यामुळेच या भेटीला ‘राजकीय संकेत’ म्हणून पाहिले जात आहे.

या संदर्भात राजेंद्र फाळके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रा. राम शिंदे यांनी सकाळी फोन करून चहापानासाठी येण्याची सूचना दिली होती. ते आमच्या घरी आले, दिवाळीचा फराळ केला, आणि पाहुणचार म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला,” असे फाळके यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात या भेटीमुळे नव्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दिवाळीच्या उत्सवात हा ‘राजकीय बॉम्ब’ ठरल्याची चर्चा सुरू आहे.