कांग्रेसवर होत असलेल्या अत्याचार लक्षात घेता नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे असा, सल्ला रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. इतकच नाही तर पटोले यांनी आमच्या सोबत यावं अशी ऑफर रामदास आठवलेंनी दिलीय. नाना पटोलेंचा मतदारसंघ असणाऱ्या भंडाऱ्यामध्ये पत्रकारांशी चर्चा करताना आठवलेंनी ही ऑफर दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा शिवसेना आणि भाजपाच्या युतीसंदर्भात आठवले यांनी भाष्य केलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत शिवसेना आणि भाजपा राज्यामध्ये पुन्हा युतीच्या माध्यमातून सत्तेत येऊ शकते असं अनेकदा आठवले यांनी जाहीर पत्रकार परिषदांमध्ये म्हटलं आहे. मात्र आता त्यांनी थेट काँग्रेसलाच भाजपासोबत येण्याची ऑफर दिलीय.

भाजपा सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण करत असून यात भाजपला यश मिळत नाही या प्रश्नावर बोलतांना रामदास आठवलेंनी थेट काँग्रेसला ऑफर दिली आहे. “सध्या नाना पटोलेसारखे डॅशिंग नेत्याची त्यांच्या कांग्रेस पक्षाला आवश्यकता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना म्हणावं तितकं महत्व मिळत नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी सोनिया गांधींशी बोलून सरकारमधून पाठिंबा काढण्याचं आमचं निवेदन आहे,” असं आठवले म्हणालेत.

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या केंद्रस्थानी असलेल्या भोंग्याच्या विषयांवरुनही आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. “भोंगे काढण्याचा विषय राज ठाकरेंनी करु नये. भोंगे काढण्याची सोंगं राज ठाकरेंनी करु नये. दादागिरी फक्त आपल्याला करता येतं असं अजिबात नाहीय. दादगिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशापद्धतीची भूमिका त्यांनी घेऊ नये. भोंगे काढलेच नाही तर अशाप्रकारचा धमकी वजा इशारा देणं चुकीचं आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लीम धर्मियांचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी आहे,” असंही आठवलेंनी म्हटलंय.

“मंदिरांवर ज्यांना भोंगे लावायचे आहेत त्यांनी लावावेत. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव असतो, भीम जयंती, शिवजयंती असते तेव्हा मोठे डीजे असतात. त्याचा मुस्लिमांना त्रास होतो. मात्र त्यांची याबद्दल काही अजिबात तक्रार नाहीय. त्यामुळे अजानसंदर्भात भोंगे काढण्याची ही भूमिका आहे ती संविधानाच्याविरोधात आहे. ही भूमिका आहे ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा,” असं मत आठवलेंनी व्यक्त केलंय.

“पूर्वी त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग, भगवा रंग, हिरवा रंग, पांढरा रंग असे सगळे रंग होते. त्यामुळे आता त्यांचे रंग बदलतायत हे बरोबर नाहीय. सगळ्या रंगाना घेऊन पुढे जायचं आहे, एखाद्या रंगाला घेऊन पुढे जाण्याचा विषय नाहीय,” असा टोलाही आठवलेंन लगावला. पुढे बोलताना, “आम्हाला भगवा रंग प्यारा आहे. भगवान गौतम बुद्धांनी भगव्या रंगाला फार महत्व दिलं होतं. त्यामुळे भगव्या रंगाबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो भगवा पडतो त्याने त्याने मुघलांना आणि दुश्मनांना चारी मुंड्या चीत केलं होतं. त्यामुळे भगवा घ्यावा. पण वाद होण्यासाठी तो अंगावर घेऊ नये. समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी काम करणं आवश्यक आहे,” असं आठवले म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale offer to congress and nana patole scsg
First published on: 20-04-2022 at 12:22 IST