राज्यातील सत्तांतरानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली वाढल्या आहेत. मंत्रीपदांच्या वाटपासाठी शिंदे आणि भाजपा यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यासाठी तारीख निश्चित केली जाऊ शकते. शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमध्ये मनसेलाही मंत्रीपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना आता भाजपाचा सहयोगी पक्ष आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मनसेला मंत्रीपद देण्यास आमचा विरोध आहे, असे आठवले म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> सुनावणी लांबणीवर?; राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

“मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा संबंध येत नाही. मनसे वेगळा पक्ष आहे. हा पक्ष शिवसेना, भाजपा किंवा आमच्यासोबतही नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुकांमध्ये ते आमच्यासोबत नव्हते. असे होत असेल तर आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही,” असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणालोच नाही,” शरद पवार यांचे स्पष्टीकरण

कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून निवडून आलेले राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी राज्यसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच नवीन शिंदे सरकारचा राष्ट्रवादी, काँग्रेसला शह देणे एवढाच कार्यक्रम असल्याने आपल्यात दुही कशासाठी? असा विचार करून भाजप, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी सामोपचाराने काम करून विकास कामांबरोबर आपले राजकीय इप्सित साध्य करू, अशी चर्चा या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ वर्तुळात सुरु आहे. याच कारणामुळे मनसेला भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मनसेचा आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा तसेच कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, शिवसेनेत असलेली धुसफूस कायमची संपुष्टात आणण्यासाठीही हे मंत्रीपद दिले जाऊ शकते.

हेही वाचा >>> औरंगाबादच्या नामांतरावर राष्ट्रवादी नाराज? शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “याची यत्किंचितही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? याबाबतची निश्चित तारीख समोर आलेली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दोन दिवसीय दिल्ली दौऱ्याहून परतले आहेत. या दौऱ्यात खातेवाटपाचा फॉर्म्यूला ठरला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.