मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यातील (नागपूर) दलित नेते व माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या ‘पीपल्स रिपब्लिकन पक्षा’सोबत हातमिळवणी केली आहे. दलित नेते जोगेंद्र कवाडे यांना युतीत घेतल्यामुळे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. कवाडे यांना युतीत घेण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यांनी थेट घोषणा केली, हे योग्य नाही, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. ते चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

कवाडे आणि शिंदे गटाच्या युतीबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले, “प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे चांगले मित्र आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र राहिलो आहोत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांना आपल्यासोबत घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणं अत्यंत आवश्यक होतं. महायुतीत नवीन लोकांचं स्वागत आहे. पण आम्हाला विचारात न घेता, थेट जी घोषणा करण्यात आली, ती अयोग्य आहे, असं आपलं मत आहे,” अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.

हेही वाचा- शिंदे-कवाडे युतीचा राजकीय लाभ कोणाला?

आठवले पुढे म्हणाले, “नवीन व्यक्तीला किंवा पक्षाला महायुतीत घेताना किमान चर्चा होणं आवश्यक होतं. याबाबत एकनाथ शिंदे भाजपाशीही बोलले आहेत की नाही? हे मला माहीत नाही. शिवसेनेत कुणाला घ्यायचं असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. जोगेंद्र कवाडे किंवा इतर दुसरा कुठला नेता शिवसेनेत जात असेल तर त्यासाठी आम्हाला विचारण्याची आवश्यकता नाही. पण कुठल्याही नवीन पक्षाला युतीत घ्यायचं असेल तर आम्हालाही विश्वासात घेतलं पाहिजे,” अशी नाराजी आठवलेंनी व्यक्त केली.

हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदास आठवले पुढे म्हणाले, “कवाडेंना युतीत घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. ते नागपूरच्या अधिवेशनात व्यग्र होते. आम्हीही दिल्लीच्या अधिवेशनात होतो. त्यामुळे मी त्या दोघांशीही बोलणार आहे. पुढे असा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घ्यावं असं आमचं मत आहे. किमान दलित समाजातून कुणाला महायुतीत घ्यायचं असेल तर आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे,” असंही रामदास आठवले म्हणाले.