शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करुन राज्यात भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नगरसेवक आणि नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असतानाच आता शिवसेनेचे कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी आपण पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. यामध्ये रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचं उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे. त्याचप्रमाणे रामदास कदमांनी राजीनामा देण्यामागील कारणंही पत्रात सांगितली आहेत.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळालं,” असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केलीय.

“आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले,” असंही रामदास कदम यांनी पत्रात म्हटलंय.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

“विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मीडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही,” असंही रामदास कदम या पत्रात म्हणतात.

“मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक्ष शिवसैनिक याचा साक्षीदार आहे,” असं कदम यांनी आपलं शिवसेनेसोबत असणारं नातं सांगताना म्हटलंय.

नक्की वाचा >> ‘गरज पडली तर…’ ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

“२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदास कदम यांच्या या पत्रामुळे मागील अनेक दशकांपासून पक्षासोबत असणारा आणखीन एक नेता पक्षापासून दूर गेल्याचं चित्र दिसत आहे. आता रामदास कदम शिंदे गटासोबत जातात का हे येणारा काळच सांगेल.