Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death Controversary: दसऱ्याच्या निमित्ताने शिंदे गट व ठाकरे गटाच्या मेळाव्यांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, यामध्ये मोठी चर्चा सुरू झाली ती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी भाषणात केलेल्या एका गंभीर दाव्याची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, एकीकडे कदम यांनी ठामपणे दावा केला असताना दुसरीकडे शिंदे गटातील इतर प्रमुख नेते मात्र सावध प्रतिक्रिया देत आहेत.
काय म्हणाले रामदास कदम?
“शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं”, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
“कुणीतरी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या हातांचे ठसे घेतले गेले. हे ठसे कशासाठी घेतले? मातोश्रीमध्ये तेव्हा सगळी चर्चा चालली होती. माझी आणखीही एक विनंती आहे की बाळासाहेब ठाकरेंचं मृत्यूपत्र कुणी केलं? कधी झालं? त्यात सही कुणाची होती? याची सगळी माहिती काढा”, असंही रामदास कदम भाषणात म्हणाले.
कदमांनी दावा केला खरा, पण नेतेमंडळींचा मात्र सावध पवित्रा!
दरम्यान, रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. पण, खुद्द शिंदे गटातील नेते मात्र या दाव्यावर सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
१. दादा भुसे:
मला वाटतं ते त्यांचं मत आहे. तुम्ही याबाबत त्यांच्याशी बोला. मला यासंदर्भात काही माहिती नाही.
२. गुलाबराव पाटील
त्यावेळी रामदास कदम त्या सगळ्या घडामोडींमध्ये सक्रीय होते. मी ग्रामीण भागात होतो. त्यांना जे माहिती आहे, ती माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यांनी आता खुलासा केलाय. आम्हाला त्यातलं काही माहिती नाही. आम्ही त्यावेळी सर्वसाधारण कार्यकर्ते होतो.
३. शंभूराज देसाई
हे अतिशय खळबळजनक विधान आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अशी काही गोष्ट आत्तापर्यंत बाहेर आली नसेल, तर ते गंभीर आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे त्या वेळचे मातोश्रीच्या अंतर्गत वर्तुळातले महत्त्वाचे नेते होते. ते ज्या अर्थी बोलतायत त्यात १०० टक्के तथ्य आहे, यात खोलवर जाणं आवश्यक आहे.
४. नीलम गोऱ्हे:
मातोश्रीच्या भिंतींच्या आत काय घडतं यावर पूर्वी कधी चर्चा होत नव्हती. बाळासाहेबांच्या मृत्यूवेळी आम्ही धक्क्यात होतो. पण रामदास कदम यांनी जे विधान केलंय ते फार गांभीर्यानं घ्यायला हवं. त्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील तर ते वेदनादायी आहे. रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत. ते हे सगळं सांगत असतील, तर त्यात तथ्य असेल. याबाबत एकनाथ शिंदे त्यांना योग्य वाटेल ते करतील.
५. प्रताप सरनाईक
रामदास कदम यांचं विधान गांभीर्यानं घ्यायला हवं. ते बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय जवळचे जुने सहकारी होते. जवळपास ५० वर्षांहून जास्त काळ ते बाळासाहेबांसोबत होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानात काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवी.
६. श्रीकांत शिंदे
रामदास कदम शिवसेनेच्या स्थापनेपासून काम करत आहेत. ते बोलतात ते प्रत्येकानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे.