राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना जिल्ह्य़ाच्या राजकारणात काहीही स्थान उरले नसल्यामुळे त्यांनी उद्विग्नतेतून आपल्यावर टीका केली असावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज येथे दिली.
कदम यांनी गेल्या २१ ऑक्टोबर रोजी चिपळूणमधून समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाधव यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा अरुण गवळीच्या हाताखाली काम करणे चांगले, अशा शब्दांत त्यांची संभावना केली. यावर आज येथे पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले की, कदम यांच्या अशा वक्तव्यावर काय बोलणार? चिपळूण तालुका आणि जिल्ह्य़ाच्या राजकारणात त्यांना कोणीही स्वीकारायला तयार नाही. कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांना कार्यकर्ते बोलवत नाहीत. या नैराश्यातून त्यांनी माझ्यावर अशी टीका केली असावी. पण मला जिल्ह्य़ापुरते बघून, बोलून चालणार नाही. सबंध राज्यात पक्षसंघटनेचे बळ वाढवायचे आहे. त्यामुळे या विषयावर जास्त भाष्य करण्यात अर्थ नाही.
आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे एकत्र लढवण्याचा निर्णय झाला आहे. पण त्यासाठी जागा वाटपाचे सूत्र मागील निवडणुकीप्रमाणे २६-२२ असेच राहील, याचा जाधव यांनी पुनरुच्चार केला.
ते प्रतिनिधित्व करत असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा नियोजन मंडळातून यंदा अजून एकही काम मंजूर झालेले नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.