आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचा मुद्दा प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच आता ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट फेम पिट्या भाई अर्थात अभिनेते रमेश परदेशी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची साथ सोडत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे.

रमेश परदेशी काय म्हणाले?

“सगळ्यांना जय महाराष्ट्र! मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. परंतू महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंसह मागची २० वर्षे काम करत होतो. आत्ता बदलेली राजकीय स्थिती पाहता कलाकारांना, मराठी चित्रपटांना न्याय देण्यासाठी आणि माझ्यावर असलेले संघाचे संस्कार हे मला खुणावत होते. त्यामुळे मी जाहीर रित्या भाजपात प्रवेश केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखरपणे देश चालवत आहेत. त्याच प्रमाणे मराठी कलाकार, मराठी चित्रपटांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याचं काम मी राज्य सरकारच्या मदतीने करेन. संघात जसं मानलं जातं की राष्ट्र प्रथम याच तत्त्वावर विश्वास ठेवून मी भाजपात प्रवेश केला आहे.”

मी राज ठाकरेंसह २२ वर्षे काम केलं आहे-परदेशी

मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीही लपवलं नाही. मी राज ठाकरेंसह २२ वर्षे काम केलं. सोशल मीडियावर दसरा संचलनाचे माझे फोटो आहे. राज ठाकरेंनी मला सुनावलं वगैरे नाही. आम्ही सगळ्या गोष्टी खिलाडू वृत्तीने घेतो. संघाचे माझ्यावर संस्कार आहेत. बदलत असलेल्या परिस्थिती मला वाटलं की आपण आपल्या विचारांसह रहावं म्हणून मी भाजपात आलो आहे. माझी राज ठाकरेंबाबत किंवा मनसेबाबत कुठलीही तक्रार नाही. प्रश्न संस्कार आणि तत्त्वाचा आहे, संघ हा माझा संस्कार आहे. मला माझ्या संस्कारांनी सांगितलं की तू तुझ्या विचारांसह असलं पाहिजे त्यामुळे मी भाजपात आलो आहे. असं रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत रमेश परदेशी?

अभिनेते रमेश परदेशी यांनी चित्रपटांमधून अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक अधिक गाजला. मात्र, त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘पिट्या भाई’ ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. या आधी रमेश परदेशी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘बेरीज वजाबाकी’ आणि अजय देवगण याच्या ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.