सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असे ते म्हणाले. सावंतवाडी मतदारसंघाच्या शासकीय आढावा बैठकीला आले होते. या ठिकाणी पोलीस छावणीचे रूप आले होते.

विनायक राऊत खासदार माझ्यामुळे झाले आहेत त्यामुळे आमदारकीच्या आधी लोकसभा निवडणूक लागते हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा देत ते स्वत:ला मुख्यमंत्री समजत होते असा टोला खासदार विनायक राऊत यांच्या वर हाणला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण खासदार विनायक राऊत स्वत: मुख्यमंत्री समजत होते असे ते म्हणाले.

   आमदार दीपक केसरकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी विकासाच्या मुद्दय़ावर एकमत करायला मी कधीही तयार आहे. मात्र नारायण राणे, त्यांचे सुपुत्र यांनी  उद्धव ठाकरे,  मातोश्रीवर बोलण्याचे टाळले पाहिजे. राणे यांच्याकडे रोजगार निर्माण करणारे मंत्रालय आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. 

आमदार केसरकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार यांना समजून घेतले पाहिजे. चौकडीने आमदार व खासदार यांना उद्धव ठाकरे यांच्या पासून दूर ठेवले त्यामुळे दिलदारपणे सर्वाना जवळ घेतले तर भविष्यात शिंदे गटाशी जुळवून घेतील, असे आम्हाला आजही वाटते. वडीलकीच्या भूमिकेत त्यांनी तसा निर्णय घ्यावा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यामुळे हा वाद कायम राहणार नाही, असेही सूतोवाच त्यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने चमत्कार घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारे नेते आहेत तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जोडी राज्याला गतवैभव निर्माण करून देणार आहे. त्यामुळे करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे पडला तो पुढे जाण्यासाठी आमचा प्रयत्न राहील असेदेखील आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. माझ्या विरोधात घोषणा देऊन विकास होणार नाही तुम्ही विकास करा पण माझ्या विरोधात घोषणा दिल्या तर मी गप्प राहणार नाही, असा इशाराही आमदार केसरकर यांनी दिला.