ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार आहे त्या मार्गावर देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. ते जालन्यात बोलत होते. दानवे यांच्या हस्ते आज मनमाड-मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचीही उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू असून या महिन्यात बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर निघणार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडत असून ही जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असदेखील दानवे यांनी सांगितले.

तसेच कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी काल राज्य सरकारने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर चांगलीच टीका केली. राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धुळफेक असून या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचं कराड म्हणाले. तसेच हा अर्थसंकल्प कागदावर आणि हवेतच विरघळून जाणार असल्याचंही कराड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कराड यांच्या भाषणाआधी काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना टोला लगावला. जालन्यात काँग्रेसच्या हातात आधी कमळ होतं आणि यापुढेही राहील, असं गोरंट्याल म्हणाले. त्यानंतर कराड यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली. तसेच तुम्हाला पक्षात कुठे अॅडजस्ट करायचं ते रावसाहेब दानवे ठरवतील असंही कराड म्हणाले.