राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश दिल्याने विरोधकांकडून टीका होत असताना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. देशाला ७५ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या मंत्र्यांनी केलेली ही घोषणा आहे. ती योग्य आहे, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

”वंदे मातरम्’ म्हणणे काही गैर नाही. देशाच्या प्रती ज्या व्यक्तीला स्वाभिमान आहे. त्याने ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे. मात्र, सरकारने असा कुठलाही नियम काढलेला नाही. ज्यांना कोणाला ‘वंदे मातरम्’ म्हणणे आवडते, त्यांनी ते म्हणावे. तसेच ज्यांना याला विरोध करायचा आहे, त्यांनी विरोध करावा. देशाला ७५ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या मंत्र्यांनी केलेली ही घोषणा आहे. ती योग्य आहे”, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘वंदे मातरम’ नाही म्हटलं तर जेलमध्ये टाकणार का? विचारणाऱ्या आव्हाडांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले “हा दोष आपल्या…”

नेमकं काय आहे प्रकरण?

देशाच्या अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर ‘हॅलो’ न म्‍हणता ‘वंदे मातरम्’ म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर मोठा निर्माण झाला आहे.

हेही वाचा – Vande Mataram: ‘जय बळीराजा’ म्हणा.., काँग्रेस कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन

विरोधाकांकडून टीका –

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी ‘वंदे मातरम्’ बाबत केलेल्या घोषणेनंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ”आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा. असा पर्याय द्यावा की, जो सर्वांना मान्य असेल. याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करुन राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी म्हटले आहे. तर काँग्रसनेही यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ‘वंदे मातरम’ आमचा स्वाभिमान आहे. तर बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणावं, अशी सूचना नाना पटोलेंनी केली आहे. तसेच भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.