सापाच्या विविध प्रजाती आहे. त्यातील काही अत्यंत दुर्मीळ स्वरूपाच्या प्रजाती आहेत. अशाच दुर्मीळ प्रकारात मोडणारा ‘व्हाईट एल्बिनो कोब्रा’ हा पांढऱ्या रंगाचा साप जुनोना गावातील विलास आत्राम यांच्या घरात आढळला. या सापाला पकडून त्याची नोंद घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला लागून जुनोना गाव व जंगल आहे. तिथे विलास आत्राम यांचे वडिलोपार्जित कौलारूचे घर आहे. या घरात शुक्रवारी रात्री या एल्बिनो कोब्रा प्रजातीच्या या सापाने प्रवेश केला. यावेळी आत्राम कुटुंबीय गाढ झोपलेले होते. घरातील स्वयंपाक खोलीत सिलिंडरजवळ सापाने बस्तान मांडले. दरम्यान रात्रीच्या वेळी सिलिंडर काहीसे हलल्याचा आवाज झाल्याने विलास आत्राम यांनी दिवा लावून बघितले असता पांढऱ्या रंगाचा साप दिसून आला. त्यांनी हळूच कुटुंबाच्या सर्व सदस्यांना उठवून घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी जुनोना येथील सर्पमित्र किशोर पेटकुले याला भ्रमणध्वनीवर घरात पांढरा साप निघाल्याची माहिती दिली. पेटकुले यांनी माहिती मिळताच सहकारी मित्रांसह आत्राम यांचे घर गाठले, तोवर सापाने त्याची जागा बदलली होती. तो नेमका कुठे गेला याचा शोध घेत असतांनाच त्याने घराच्या कवेलूत दडी मारल्याचे दिसून आले. रात्रीची वेळ असल्याने सर्पमित्रांना सापाचा शोध घेण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागले.

एक ते दीड तासानंतर पेटकुले व मित्रांना सापाला पकडण्यात यश आले. हा साप ‘व्हाईट एल्बिनो’ या नावाने ओळखला जात असल्याची माहिती सर्पमित्र किशोर पेटकुले यांनी दिली. जिल्हय़ात पहिल्यांदाच या सापाची नोंद घेण्यात आलेली आहे. या सापाची लांबी ४ फूट ९ सेमी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या प्रजातीच्या सापांची वाढ कमी असते. मात्र हा साप पूर्ण वाढलेला होता. त्वचेला होणाऱ्या ‘अल्बीनझम’ या आजारामुळे त्वचा अगदी पांढरी शुभ्र होते. पांढऱ्या त्वचेमुळे साप एल्बिनो म्हणून ओळखला जातो. क्वचित प्रसंगी सापामध्ये हा आजार दिसून येतो. चंद्रपूर जिल्हय़ात कोब्रा प्रजातीचे साप मोठय़ा संख्येने आढळून येत असले तरी एल्बिनो कोब्राची ही पहिलीच नोंद आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare white albino cobra found in chandrapur district
First published on: 31-08-2017 at 06:07 IST