सतीश कामत

गेले आठ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरातील डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मारुती मंदिर शिवाजीनगर या पट्टय़ात दर दहा मीटर अंतरावर एक खड्डा पडलेला आहे. मुख्य बसस्थानकापासून खाली आठवडाबाजार, काँग्रेसभवन, मारुती आळी या परिसरात खड्डेच खड्डे आहेत. आठवडाबाजार ते काँग्रेसभवन या रस्त्यावर सहा महिन्यांत चार वेळा दुरुस्ती झाली. पण खड्डे आहेतच.

कोकण नगर परिसरातही काही महिन्यांपूर्वी नव्याने रस्ता करण्यात आलेला आहे. त्याची डांबरातील बारीक खडी वर आल्यामुळे चाळण झाली आहे. त्यावरून दुचाकी घसरण्याची भीती सर्वाधिक आहे. नाचणे रोडकडे जाणाऱ्या परिसरात आरोग्य मंदिर रस्त्यावरही छोटे-छोटे खड्डे पडलेले आहेत. रहाटाघर येथे एसटी गाडय़ांच्या येण्या-जाण्यामुळे तयार झालेल्या खड्डय़ात कायम पाणी साठून राहिलेले असते. जयस्तंभाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळून जाणारा रस्ताही खड्डय़ांपासून चुकलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी नगर परिषदेने ऐन पावसात खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली होती. हे खड्डे जांभ्या दगडाच्या चुऱ्याने बुजवले जात आहेत. मोठा पाऊस पडला की पुन्हा ते सगळं रस्त्यावर येणार आहे. नगर परिषदेचा निधी मात्र व्यवस्थित खर्ची पडणार आहे.शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे. पण अजून पुढे काही नाही. त्यामुळे पावसाळा आणि रत्नागिरी शहरातील खड्डे हे समीकरण यंदाही कायम आहे.