रत्नागिरी जिल्ह्यात राणे-सामंत वाद पुन्हा उफाळून येवू लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या या दोन नेत्यांमधील वाद संपण्याचे नाव घेत नाही. आता या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये जाहिरात युद्ध सुरु झाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर खासदार नारायण राणेंचे फोटो न छापणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अनुसूचित जाती मोर्चा रत्नागिरी, दक्षिण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय सुरेश निवळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेची माहिती देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतमधून जाहिराती करण्यासाठी बॅनर्स लावले जात आहेत. यासाठीचा संपूर्ण खर्च राज्य शासन करत आहे. लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारची योजना असून ती कोण्या एकट्याची नाही. या योजनेच्या जाहिराती बॅनरसाठी प्रशासन स्वतः खर्च करत आहे. नारायण राणे हे माजी केंद्रीय मंत्री असून सध्या महायुतीचे नेते व रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. या योजनेच्या जाहिरात बॅनरवर जर प्रशासन खर्च करत असेल तर रत्नागिरीमधील या योजनेच्या सर्व जाहिराती बॅनर्सवर नारायण राणे यांचा फोटो असणे आवश्यक आहे. बॅनरच्या वरच्या बाजूस एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री व खाली जिल्ह्याचे पालकमंत्री व या मतदारसंघाचे खासदार म्हणून नारायण राणे यांचा फोटो असणे आवश्यक आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये लावलेल्या बॅनर्सवर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो झळकत आहे. यावरून प्रशासन, प्रशासनातील अधिकारी दुजाभाव करत असल्याचे दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हेही वाचा - Amol Kolhe : “गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…”, अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका; म्हणाले… हेही वाचा - Uddhav Thackeray : “काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंचे हात रिकामे”, भाजपाचा टोला; म्हणाले, “मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत…” रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कोण्या अधिकाऱ्याची, अधिकाऱ्यांच्या जहागीर नाही. ज्या ग्रामसेवक संघटनेने ही डिझाइन ठरवली, त्या संघटनेचा जो कोणी अध्यक्ष असेल त्याने हे नमूद केलेले आहे की 'उद्योगमंत्री आणि गट विकास अधिकारी यांच्या मार्फत हे आदेश आहेत की, अशा प्रकारचे बॅनर कोणाला हवे आहेत, त्यांनी लवकरात लवकर सांगावे ग्रामपंचायतीच्या नावासह बॅनर दिले जातील' अशा आशयाचे मेसेज सर्वत्र फिरत आहेत. हे कितपत योग्य आहे? असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. प्रशासनातील अधिकारी जाणून बुजून हा दूजाभाव करत आहेत. तरी ज्या व्यक्तीने हे बॅनर्स डिझाईन केले आहेत व ज्या ठिकाणी लागले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. या बॅनर्सबाबत व वरील आशयाच्या गट विकास अधिकारी यांचे नाव घेऊन जे मेसेज ग्रामसेवक संघटना ग्रुपमध्ये फिरत आहेत, याबाबत मी स्वतः गट विकास अधिकारी यांना तोंडी सांगितले होते की, तुम्ही त्वरित लक्ष देऊन जे कोणी असे मेसेज सगळीकडे महसूल सहायक पसरवत आहेत ते बंद करा व त्यांच्यावर कारवाई करा. ग्रामपंचायतमधील बॅनर्सवर नारायण राणे यांचा फोटो येऊ दे यावर गट विकास अधिकारी यांनी आम्ही लावतो असे सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही. ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन बडद व जिल्हाध्यक्ष सदानंद शिंदे यांना सूचित करून जिल्ह्यात आणि तालुक्यात राणे साहेबांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर फोटो लावावा आणि तालुक्यात ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षांनी जो मॅसेज व्हायरल करून स्वत घेतला त्यावर संबंधित अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न करता ही जाहिरात केली त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा निर्णय घेण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी रत्नागिरी, तहसीलदार रत्नागिरी, शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन आदींना पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.