रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झालेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व जिवीत हानी झाली आहे. जिल्ह्यातील ११६ ठिकाणी आपत्ती उद्भवली आहे. मात्र जिल्ह्यात झालेल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी गेले दोन महिने शासनाकडून कोणताच निधी आला नाही, त्यामुळे आपत्तीग्रस्तांना राज्य शासनाच्या मदतीची वाट पाहावी लागत आहे. जिल्ह्यात ३ कोटी २५ लाख ८९ हजार २०० रुपये एवढी नुकसान भरपाई आहे. मात्र शासनाकडे ही नुकसान भरपाई देण्यासाठी निधी नसल्याने आपत्तीग्रस्तांना निधीची वाट बघण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. लाडक्या बहिण योजनेमुळे कोलमडलेल्या शासनाच्या बजेटमुळे आपत्तीग्रस्तांना निधीपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील वर्षाच्या मानाने यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेत कमी झाले आहे. यावर्षीचा पावसाला मे महिन्याच्या मध्यापासून सुरु झाला. मात्र पावसाने सुरुवाती पासूनच जिल्ह्यात थैमान घालण्यास सुरुवात केले. या पावसामुळे जिल्ह्यात जिवीत व वित्तहानी होवून मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११६ ठिकाणी एकूण ३ कोटी २५ लाख ८९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत जून आणि जुलै महिन्यात कमी आहे, तरीही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात पावसाळ्यात घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या निधीतून यातील दोन मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी आठ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच या आपत्तीमध्ये पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या दोघांना तात्काळ प्रत्येकी दहा हजारांची मदत देण्यात आली आहे. इतर जखमींवर औषधोपचार करण्यात आले आहेत. पावसामुळे घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १३६ कच्च्या घरांचे सुमारे ४१ लाख ९० हजार २६५ रुपयांचे, तर १९३ पक्क्या घरांचे सुमारे ५८ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे आतापर्यंत १० जनावरांचा मृत्यू झाला असून, २ जनावरांसाठी ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांच्या भरपाईचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
व्यवसाय आणि शेतीचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पूर आणि पाणी शिरल्याने ११ दुकानांचे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. तर, आंबा व काजू बागायतदारांसह ७१८ शेतकऱ्यांच्या सुमारे १०० हेक्टरवरील शेतीचे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कोसळणा-या पावसामुळे महावितरणचेही मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ५२ वीज खांब, १२ ट्रान्सफॉर्मर आणि ७ विहिरींचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या ८ शाळांचे सुमारे १५ लाख ५४ हजारांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विविध प्रकारच्या ११६ आपत्ती घटनांमध्ये एकूण ३ कोटी २५ लाख ८९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीच्या भरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक बजेट कोलमडल्याने या आपत्ती ग्रस्तांसाठी निधीच न आल्याने शासनाच्या या आर्थिक मदतीची वाट पहाण्याशिवाय आपत्ती ग्रस्तांसमोर आता पर्याय राहिलेला नाही. एक प्रकारे आणखी काही दिवस आपत्तीग्रस्तांना निधी पासून वंचित रहावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्ती…
- व्यक्ती – मृत २ जखमी ५
- घरे – कच्ची घरे १३६ पक्की घरे १९३
- जनावरे – १०
- दुकाने – ११ १८ लाख नुकसान
- शेती – ७१८ शेतकरी, १०० हेक्टर शेती, २३ लाख नुकसान
- महावितरण – ५२ खांब १२ ट्रान्सफार्मर
- विहिरी – ९
- शाळा – ८ १५ लाख ५४ हजार नुकसान
शासनाकडून निधी आला नसल्याची बाब खरी आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी संबंधित निधीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासन यावर लवकरच निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच निधी येताच तात्काळ त्याचे वाटप करण्यात येईल. – जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह