रत्नागिरी – रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील राजिवडा कर्ला दरम्यान गस्त घालत असताना ब्राऊन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून ११ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन आणि इतर मुद्देमाल असा एकूण ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना, त्यांना याविषयी गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला येथे दोन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आले.
गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांची चौकशी केली. तसेच पंचांच्या समक्ष त्यांच्या ताब्यातील पिशवी तपासल्यावर ब्राऊन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थाच्या एकूण १७५ पुड्या आणि इतर विक्रीसाठी आणलेले साहित्य आढळून आले. या कारवाईत मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३१/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईत आरोपींकडून ११ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन आणि इतर मुद्देमाल असा एकूण ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.