रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे मध्यरात्री गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला शिकारीच्या उद्देशाने फिरणा-या चार जणांना एका बोलेरो पिकअपसह ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून १२ बोअर बंदूक १, जिवंत काडतुसे ६, हँड टॉर्च २ आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मध्ये विश्वनाथ शांताराम मालप (२९), रा. अणदेरी गजानन मानसिंग इंदुलकर (४३), रा. हेदली रुपेश धोंडू पोमेंडकर (४१), रा. कारभाटले राहुल रविंद्र गुरव (२८), रा. तिवरे घेरा प्रचितगड या चौघांचा समावेश आहे. हे चौघेही बोलेरो पिकअप (एमएच ०८ एपी ८६२१) गाडीच्या टपावर बसून हँड टॉर्चचा प्रकाश टाकून वन्य प्राण्यांच्या शोधात होते. वन विभागाच्या पथकाने त्यांना थांबवून गाडीची तपासणी केली असता मोठा मुद्देमाल हाती आला. या गाडीतून १२ बोअर बंदूक १, जिवंत काडतुसे ६, हँड टॉर्च २ आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत ४ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बोलेरो वाहनासह सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी (संगमेश्वर-देवरुख), वनरक्षक सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, यांचा समावेश होता. याशिवाय पोलीस पाटील अणदेरी महेंद्र होडे, राजवाडी पोलीस पाटील विलास राऊत, सुलतान मालगुंडकर आणि अनंत तोरस्कर यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.
शिकार अथवा अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आपल्या परिसरात आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा,” असे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.
