रत्नागिरी : महायुती झाली तर सन्मानाने जागांचा तोडगा निघावा, आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत. आम्हाला कमी लेखले जाऊ नये. मात्र युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे कार्यकर्त्यांना आमदार शेखर निकम यांनी सांगितले. वांझोळे येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पार्श्वभूमीवर हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा वांझोळे येथे घेण्यात आला. या मेळाव्यात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, माजी सभापती पूजा निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, माजी सभापती विजय आप्पा गुजर, तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेटकर, हनीफ हरचरकर, बाळु ढवळे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर शेकासन, पंकज कुसाळकर, सुशील भायजे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मानसी करंबळे, बाळा पंदेरे, वांझेळेच्या सरपंच निधी पंदेरे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, नितीन भोसले, राजू सुतार, उदय सावंत, संतोष अणेराव, हुसेन बोबडे, उस्मान साटविलकर, अनंत जाधव, संतोष गोताड, परशुराम चोगले, गजानन गुरव, दत्ताराम चव्हाण, विनायक वाजे, विनायक गुरव, राजाभाऊ चव्हाण, भाऊ शेडगे, बाबा पंदेरे, शांताराम सनगले, नंदू सावंत, विजय भुवड, प्रतीक साळवी, कृष्णा कदम, मानसी करंबळे, चंद्रकांत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ते म्हणाले की, २०२९च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करू नका, आपलं काम करत राहा. आता युती होईल की नाही, हे आता सांगता येत नाही, मात्र झाली तर ठीकच, नाही तर आपण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवू या, असे स्पष्ट केले. यावेळी हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे प्रामाणिक आणि सर्वसामान्य घरातून पुढे आलेले कार्यकर्ते मंगेश बांडागळे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी एकमुखाने केली. यावर बोलताना आमदार निकम म्हणाले, मंगेश हा एक सामान्य कार्यकर्ता असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सातत्याने काम करतो आहे. त्याच्यासाठी मी पक्षाकडे नक्कीच शब्द टाकेन. माझ्या सुरुवातीपासून तो माझ्यासोबत निष्ठेने उभा आहे, असे ही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये प्रदीप कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास त्या जिंकून आणणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला. खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर यावेळी म्हणाले, २०२४च्या निवडणुकीत आम्ही कमी पडलो. संगमेश्वर तालुक्याने आमदार शेखर निकम यांना विजयी केले म्हणून आम्ही चिपळूणमध्ये फटाके फोडू शकलो. मात्र यापुढे आम्ही गाफील राहणार नाही. आमदार निकम म्हणजे विकासाचे दुसरे नाव आहे. त्यांच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे राहून संगमेश्वर तालुक्यासाठी काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयोजित मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय कदम यांनी मानले.