रत्नागिरी : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी शनिवारी संध्याकाळच्या सुमारास महिंद्रा थार गाडीच्या झालेल्या अपघातानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारा-यावर वाहने नेवून कसरत करणा-या पर्यटकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच किनारी भागात पोलिसांकडून आता गतिरोधक उभे करण्यात आले आहेत.

कर्दे समुद्रकिनारी शनिवारी संध्याकाळच्या सुमारास महिंद्रा थार गाडी (क्रमांक एमएच १२ एक्स टी १७८८) समुद्राच्या पाण्यातून भरधाव वेगाने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून उलटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडी जेसीबीच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल होताच गाडी चालविणा-या पर्यटकांने घटनास्थळावरुन पळ काढला.

येथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वारंवार सूचना करूनही पर्यटक समुद्राच्या किनाऱ्यावर गाड्या भरधाव वेगाने चालवत असतात. यामुळे इतर पर्यटकांच्या जिवितास धोका निर्माण होत असतो. समुद्रकिनाऱ्यावर गाड्या घेऊन जाण्यावर तातडीने कडक बंदी घालावी.

नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करावी.नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी.अशी मागणी जोर धरु लागली आहे. या घटनेनंतर रत्नागिरी पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना व पर्यटकांना समुद्रकिनारी वाहन चालवण्यास मनाई आदेश काढण्यात आला आहे. कर्दे येथील समुद्रकिनारी अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालका विरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात समुद्रकिनारी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्या बद्दल गुन्हा रजिस्टर नंबर १७१/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ११०, २८१, १२५ व मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या संदर्भात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिक व पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची वाहने नेऊ नयेत अथवा चालवू नयेत. समुद्रकिनारी वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या विरुद्ध रत्नागिरी पोलीस दलामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल. समुद्रकिनारी येणारी लहान मुले, जेष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशा प्रकारे कोणी समुद्रकिनारी नियमभंग करून धोकादायक वाहन चालवताना आढळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा डायल ११२ वर कळविण्यात यावे, असे पत्रक जिल्हा पोलीसां कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.