रत्नागिरी – रत्नागिरी शहरा जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अडीच कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या औद्योगिक वसाहत परिसरात एका व्यक्तीकडून तब्बल अडीच कोटी रुपये किमतीची ‘व्हेलची उलटी’ (अंबरग्रीस) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे.
रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेला १ ऑगस्ट, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, एक इसम लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी एम.आय.डी.सी. परिसरात येणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने औद्योगिक वसाहत रत्नागिरी येथे सापळा रचुन आणि रात्री १०.४५ च्या सुमारास छापा टाकला. यामध्ये एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१) रा. रत्नागिरी याला कोणतीही परवानगी नसताना, बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने २.५ किलो वजनाचे अंबरग्रीस बाळगताना पकडण्यात आले.
जप्त केलेल्या अंबरग्रीसची किंमत अंदाजे अडीज कोटी रुपये असून तसेच त्याच्याकडील ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण २ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संदीप ओगले आणि इतर पोलीस अंमलदार करीत आहेत.